अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे मंगळवारी दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी ग्रामीण भागात जावून येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे मंगळवारी गावात दिवसभर शुकशुकाट दिसून आला. दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे.
ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाईकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा तसेच सायंकाळी उत्तरपूजा केली जाते. येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, अंबिल, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी, पुरण पोळी आदीसह रानमेव्याचा आस्वाद घेतला. काळ्या आईला सजवण्याचा तसेच खाऊ-पिऊ घालण्याचा सन म्हणून याकडे पाहिले जाते.
यंदाच्या गावरान भोजनात घरगुती पदार्थ, बाजारातील फरसाण, मिठाई, फळे यांचाही समावेश दिसून आला. कडब्याच्या खोपितील लक्ष्मीची श्रध्देने पूजा करून शेत शिवार भरभरून पिकू दे अशी यावेळी प्रार्थना करण्यात आली. दिवसभर गावात मात्र शुकशुकाट दिसून आला.