नळदुर्ग , दि.२० विलास येडगे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग (मैलारपुर) येथील ऐतिहासिक शेकडो वर्षाची परंपरा असलेली श्री खंडोबाची यात्रा यावर्षी भरणार नसल्याने यात्रेत येणाऱ्या मानाच्या काठ्या आताच मैलारपुरात येऊन धार्मिक विधी उरकुन घेत आहेत.
दि.२० जानेवारी रोजी निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील मानाची काठी मैलारपुरात दाखल झाली होती. नळदुर्ग (मैलारपुर) येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्री खंडोबाची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.यावर्षी ही यात्रा दि.२७,२८ व २९ जानेवारी २०२१ रोजी भरणार आहे. मात्र कोरोनामुळे यावर्षीची खंडोबा यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. त्यामुळे यावर्षी खंडोबा यात्रा भरणार नाही. कांही मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेदिवशी सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. यात्रेत जवळपास ८०० ते ९०० मानाच्या काठ्या (नंदीध्वज) येतात.
मात्र यावर्षी या काठ्यांना मंदिर परीसरात प्रवेश देण्यात येणार नाही. त्यामुळे यात्रेत ज्या मानाच्या काठ्या येतात त्या आताच मैलारपुरात दाखल होत आहेत. दि.२० जानेवारी रोजी निलंगा तालुक्यातील एकोजी मुदगड येथील मानाची काठी मैलारपुरात दाखल झाली होती. मनोहर काळे, राम वाघे, भारत बनसोडे, लक्ष्मण रणखांब यांच्यासह ५० भाविक काठीबरोबर उपस्थितीत होते.
यावेळी जुन्या खंडोबा मंदिराला प्रदक्षिणा घालुन ही मानाची काठी नवीन खंडोबा मंदिरात दाखल झाली, यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी हलगीच्या तालावर वारू बेभान होऊन नाचत असल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले.