तुळजापूर, दि .२१ , सतिश महामुनी
श्री. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास दुपारी बारा वाजता संपन्न झालेल्या घटस्थापनेने उत्साहात सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन मर्यादित संख्येमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. नवरात्राचे यजमान राजाभाऊ कदम व पत्नी सौ मनोजा कदम यांनी यजमानपद भूषवले
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंबरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सात दिवसांपूर्वी देवीची मंचकी निद्रा सुरू झाली होती. ती निद्रा मध्यरात्री एक वाजता पूर्ण झाली. त्यानंतर देवीची मूर्ती मानकरी पुजारी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीत पहाटे चांदीच्या मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली.
आई राजा उदो, उदो, सदानंदीचा उदो, उदो या जयघोषात तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुधाचे अभिषेक करण्यात आले. देवीची मानाची आरती करण्यात आली. नवैद्य दाखवून देवीचे मुखदर्शन सुरू झाले. त्यानंतर सकाळी सात वाजता धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली . दुपारी बारा वाजता तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर घटस्थापना करण्यात आली.
सुमारे अडीच तास चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमासाठी तहसीलदार सौदागर तांदळे , यजमान राजाभाऊ कदम, सौ मनोजा कदम, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, महंत तुकोजी महाराज, महंत हमरोजी महाराज, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, नगरसेवक अविनाश गंगणे, उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, मकरंद प्रयाग, श्रीराम अपसिंगेकर बापूसाहेब रोचकरी, सुधीर परमेश्वर, इंद्रजीत साळुंखे, संजय पेंदे यांच्यासह इतर पुजारी बांधव उपस्थित होते.