उस्मानाबाद, दि. 22 :  
तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीवर थेट जनतेतून निवडून गेलेल्या सरपंचावर ग्रामस्थांनी ग्रामसभेतून व ग्रामपंचायत सदस्यांनी बैठकीत ठराव पारीत करून अविश्वास ठराव मांडला होता. दीड वर्षापूर्वी निवड झालेल्या उपसरपंचावरही ग्रामस्थ व सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. 

त्यासाठी गुप्त मतदान पध्दतीचा अवलंब करून झालेल्या मतदानानुसार सरपंच व उपसरपंच दोघेही पायउतार झाले आहेत. थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचावर अविश्वासाची झालेली कार्यवाही ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी 2017 साली शांताबाई बाबु सगट या निवडून आल्या होत्या. त्यानंतर दीड वर्षाने म्हणजेच 13 जून 2019 रोजी उपसरपंचपदी मनोहर यशवंत माने यांची निवड झाली होती. सरपंच व उपसरपंच या दोघांनीही आपल्या कार्यकाळात बेकायदेशीर प्लॉट विक्री, सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत व्यवहारात अनियमितता आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेले विषय न घेणे, अशा विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून अविश्वास ठराव मांडला होता.

 त्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरूध्द 13 ऑगस्ट 2020 रोजी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर गुप्त मतदान घेण्याकरिता गटविकास अधिकार्‍यांना  विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते.

 त्यानुसार 21 जानेवारी 2021 रोजी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत 587 इतके मतदान झाले. गुप्त मतदान प्रक्रियेत प्रथम सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी 587 मतदान झाले. त्यापैकी 573 मते वैध तर 14 मते अवैध ठरली.

 यामध्ये सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने 300 इतके मतदान झाले व त्याविरूध्द 273 इतके मतदान झाले. 27 मतांनी सरपंचाविरूध्द अविश्वास ठराव मंजूर झाला. तर उपसरपंचावरील अविश्वासासाठी 587 मतदान झाले. यापैकी 10 मते अवैध तर 577 मते वैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 302 इतके मतदान झाले तर अविश्वास ठरावाच्या विरूध्द 275 इतके मतदान झाले. 

उपसरपंचावरही 27 मतांनी ठराव पारीत झाला. त्यामुळे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी सरपंच शांताबाई सगट व उपसरपंच मनोहर माने यांच्यावर अविश्वास ठराव पारीत झाल्याचे घोषित केले. आता नवीन सरपंच व उपसरपंचाची नियुक्ती करावी, अशी मागणी सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
 
Top