उस्मानाबाद,दि.22:
येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडया निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मान्यवरांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वच व्यवहास मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे, यासाठी अग्रह धरला.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती एस.एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात 14 ते 28 जानेवारी 2021 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रभारी दिवाणी न्यायाधीश. ए. ए. शिंदे, वरिष्ठ सह दिवाणी न्यायाधीश ए. एम. पाटणकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ के. सी. कलाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. बी. तोडकर, प्रा.राजा जगताप न्यायालयीन कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.ए.शिंदे होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एस. बी. तोडकर त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार, सरस्वती सन्मान,कालीदास पुरस्कार, कलाक्षेत्रात व भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या मराठी भाषिक मान्यवरांची माहिती सांगितली. न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापराबाबत शासन निर्णय, महाराष्ट्र राज्य भाषा अधिनियम 1964 च्या तरतुदी उपस्थितांच्या निर्देशनास आणून दिल्या.
या पंधरवाडा निमित्त शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय येथे कथाकथन,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशने, चर्चासत्रे आदी कार्यक्रमाचे आयोजन करुन मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.तसेच मराठी ही आपली मायबोली आहे,तिचे जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे.न्यायालयात रोजनामे लिहितांना,साक्षी नोंदवितांना आदेश व न्यायनिर्णय पारित करतेवेळी मराठी भाषेचा वापर केल्यास पक्षकारांना प्रकरणांची कार्यवाही समजण्यास आवश्यक ते पाऊल उचलण्यास व काय निर्णय झाले हे समजण्यास मदत होईल,असेही त्यांनी सांगितले.
प्रा.राजा जगताप यांनी मराठी भाषेची माहिती देताना महापुरुषांनी त्यांचे लिखान स्वभाषेतून केले.मराठीचा उगम कसा,केव्हा झाला व कशी वाढ होत गेली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच मराठी भाषा संवर्धन करताना मराठी संस्कृती व बोली भाषा यांचेही जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता नमूद केली.समाज माध्यमांचा कमी वापर करुन गरजवंताना पुस्तकांचे वाटप करुन वाचन संस्कृती वाढीस लावावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
त्यानंतर ए.ए.शिंदे यांनी न्यायालयीन कामकाज मराठीतून करत असताना घ्यावयाची काळजी,न्यायाधीश यांना न्यायनिर्णय देत असताना दर्जेदार मराठी वापर करणे.न्यायनिर्णय सुलभ मराठी भाषेत पारित करावेत,जेणेकरुन ते सामान्य पक्षकारांना सहज समजण्यास मदत होईल,कार्यवाही कोणत्य टप्पयात आहे,कोणते पाऊल उचलणे आवश्यक आहे.हे त्यांना समजणे सुलभ होईल याबाबत माहिती दिली.
श्री.तोडकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक ए.डी.घुले यांनी केले.