उस्मानाबाद, दि. 5 : जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने आवश्यक विषयांचे प्राधान्यक्रम ठरवून ते मांडावेत. त्याची दखल घेत प्रशासनही आपल्या पातळीवर त्याच्या सोडवणुकीसाठी पुढे असेल, अशी ग्वाही देतानाच जिल्ह्यातील शेत रस्ते, गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई यांसह विविध कामांच्या माध्यमातून विकासाचा रथ पुढे नेण्याचा मनोदय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला.
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि. 5) ते बोलत होते. समर्थ हॉटेलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळात उल्लेखनीय काम करणार्या पत्रकारांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करणार्या शहरातील पत्रकारांवा विमा उतरविला होता. त्या कागदपत्रांचे वाटपही या वेळी करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यात शेत रस्ते, गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई , पुरातन स्थळांचा विकास , स्थानिक गरजानुरूप मूलभूत विकास कामे यासाठी आगामी काळात काम करण्याचे नियोजन आहे. गावातील विविध व्यावसायिकांची क्रयशक्ती टिकण्याबरोबरच वाढण्याची गरज आहे. पत्रकार आणि प्रशासनाने त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.यावेळी पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार , पत्रकारांना विमा कवच पॉलिसी वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिला बालकल्याण , शिक्षण , आरोग्य या विभागांच्या माध्यमातून जनसेवक म्हणून जनतेची सेवा करण्याचे आवाहन केले. प्रारंभी उस्मानाबाद येथील नंदकिशोर भन्साळी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संघाचे उपाध्यक्ष देविदास पाठक, रवी केसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राहुल कुलकर्णी, काकासाहेब कांबळे, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, विकास सुर्डी, सयाजी शेळके, कमलाकर कुलकर्णी, राकेश कुलकर्णी, रवी केसकर, अमोल गाडे, देविदास पाठक, राजा वैद्य, संतोष हंबीरे, बाळासाहेब माने, बालाजी निरफळ, ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी सुरवसे, प्रशांत कावरे, अजहर शेख, मल्लिकार्जुन सोनवणे, मच्छिंद्र कदम, प्रा. अभिमान हंगरकर, सुधीर पवार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर, महेश पोतदार, विठ्ठल पाटील, छायाचित्रकार कालिदास म्हेत्रे, आरिफ शेख, इस्माईल सय्यद,सागर काळे,सलिम पठाण, संतोष खुणे, पांडुरंग मते, प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते.