तुळजापूर , दि. २४, सतीश महामुनी

येथिल  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  यांच्यावर   गुन्हा दाखल करावा यासह इतर मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दि. २८ जानेवारी रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लहुजी शक्ती सेनाचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

 पत्रकार परिषदेत बोलताना सोमनाथ कांबळे पुढे म्हणाले की तुळजापूर नगरपरिषदेने ज्यांना नियुक्ती दिली आहे, त्यांना काढा अशी आमची मागणी नाही तर हक्काने ज्या १७ कर्मचाऱ्यांना अनुकंपा धर्तीवर नियुक्ती मिळाली पाहिजे तसेच ती देण्यासाठी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची  मागणी असल्याचे सांगितले. मुख्याधिकारीनी चुकीची माहिती दिल्याबद्दल व कर्मचाऱ्यांवर दबाव आणून लहुजी शक्ती सेनाची बदनामी करण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मुख्याधिकारी  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली, त्याचबरोबर यावेळी दत्तात्रय साळुंके, पी पी बरुरकर यांच्या विरूध्द कागदपत्र पुरावे दाखवून या दोघांनी संघटनेवर खोटा गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही अधिक आक्रमकपणे या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन २८ जानेवारी  रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, थेट मुख्याधिकारी यांनी माझ्या बरोबर बोलणे आवश्यक होते, मात्र त्यांनी कर्मचाऱ्यांना पुढे करून इतरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचेही  कांबळे यांनी सांगितले. 

मुख्याधिकारी  विरोधात  गुन्हा दाखल करावे यासाठी आम्ही आंदोलन करीत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील, प्रसंगी न्यायालयमध्ये  दाद मागू आणि  विशाल लोंढे आणि इतर १६ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला.

याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तुळजापूर नगरपरिषद उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून एकमेकांना करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि त्यातील त्रुटी याप्रसंगी सोमनाथ कांबळे यांनी निदर्शनास आणून देऊन नगरपरिषदेने अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रशासकीय कारभार केल्याचे ठपका त्यांनी मुख्याधिकारी  यांच्यावर ठेवला आहे, 

नगर परिषदेमध्ये १३ पदे  रिक्त असताना मुख्याधिकारी यांनी पदे रिक्त नसल्याचे पत्र दिल्याचे सांगून ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रकार निंदनीय असून सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची मागणी  केली आहे. 

दरम्यान या प्रकरणांमध्ये न.प.  कर्मचारी संघटना व मुख्याधिकारी  यांनी लहुजी शक्ती सेनावर कारवाई करण्याची मागणी यापूर्वी केली आहे त्यामुळे या दोन घटकांमध्ये गेल्या आठ दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, याप्रकरणी पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर येथे आयोजित लहुजी शक्ती सेनेच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा प्रवक्ते संजय गायकवाड, तालुका अध्यक्ष किसन देडे आणि विशाल लोंढे यांची उपस्थिती होती.


 
Top