उस्मानाबाद, दि. 11 : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयच्या हलगर्जीपणामुळे लहान मुलांच्या युनिट केअरमध्ये आग लागून दहा निष्पाप बालकांचा मृत्यू झाला.या घटनेत दोषी असणाऱ्यावर तात्काळ कारवाई अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिट केअरमध्ये आग लागून रुग्णालय प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेबाबतीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात सात दिवसांपासून विजेचं फ्लक्च्यूएशन होत असल्याचं तेथील मृत बालकांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.यापुर्वी देखील अशा हलगर्जीपणामुळे राज्यातील रुग्णालयात अनेक लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. सरकारी ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा ढिसाळ, निगरगट्ट आणि दुर्लक्षित करणारी आहे हे या प्रकरणावरून स्पष्ट दिसून येत आहे.
राज्यातील कुठल्याही सरकारी दवाखान्यात पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसते. सक्षम डॉक्टर, औषधांचा पुरवठा आणि अद्ययावत यंत्रणा या राज्यातील सगळ्या सरकारी दवाखान्यात आहेत याचं ऑडिट झाले पाहिजे. सर्व सरकारी दवाखान्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करुन पुढे म्हटले आहे की, घटनेतील दोषींवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राज्य सरकारने वेळीच पाऊल उचललं नाही तर सरकारला भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी गरड, महिला जिल्हा उपाध्यक्षा अंजली बेताळे, दमयंती वाकुरे, आशा लांडगे, पूजा राठोड, अनिता तोडकर, सुरज शेरकर, सचिन लोंढे, प्रसाद मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.