तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा रणसंग्राम ऐन थंडीच्या दिवसात चांगलाच पेटला असुन  भाजपा प्रणीत समता ग्रामविकास पॅनल व महाविकास आघाडी प्रणीत सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडीने गावामध्ये प्रचाराचा धुरळा उडवुन दिला आहे. 

तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आजी माजी सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे संचालक भ्रष्टाचार निर्मूलन चे जिल्हाध्यक्ष, माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस असे अनेक दिग्गज रणांगणात उतरल्याने या ग्रामपंचायत निवडणूकीकडे तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.भाजपा प्रणीत समता ग्रामविकास पॅनलने शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला.तर महाविकास आघाडी प्रणीत सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडीनेही मोठे शक्ती प्रदर्शन करुन प्रचाराचा नारळ फोडला.

या निवडणुकीत भाजपा प्रणीत एकता पॅनलने पाच वर्षामध्ये केलेली विकास कामे हजारो रुपये खर्च करीत एल ई डी पडद्यावर दाखवत आहेत.तर मागील सत्ताधार्यांनी पाच वर्षामध्ये विहीर ,रस्ते गायब, तलावातील गाळ, शेतरस्ते , ग्रामपंचायत,शाळा दुरूस्ती तसेच नाला खोलीकरण मध्ये भ्रष्टाचार असे अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे तसेच न केलेल्या कामाचे विविध मुद्द्याचे  कॅसेट बनवुन महाविकास आघाडीने प्रचाराचा धुरळा उडवुन दिल्याचे दिसून येत आहे. 

दोन्हीही पार्ट्या घर ते घर प्रचार करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच प्रत्येक उमेदवार आपापल्या महीला घेऊन हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करत प्रचार करताना दिसुन येत आहेत.सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत बदलाचे वारे वाहत असुन जनता आता बदल घडवून आणणार असल्याचे बोलले जात आहे.  बुधवारी सायंकाळी प्रचाराचा तोफा थंडावणार असल्याने काही उमेदवार वार्डातील नागरीकांना विविध प्रकारची अमिष दाखवुन मतदान वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. जनता या आमिषाला बळी पडणार की उमेदवारांना घरचा रस्ता दाखवणार? हे येणार्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये माजी सरपंच,उपसरपंव दत्ता वडणे विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे विरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत अशी प्रतिष्ठेची लढाई होत आहे. निवडुन येण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत असुन या दोन्ही प्रमुख लढतीसह  संपूर्ण निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 
Top