तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी सरळ आणि चुरशीची लढत होणार असून प्रभाग क्रमांक ३ मधील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रभाग क्रमांक १ मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने माजी उपसरपंच हमीद पठाण हे निवडणूक रिंगणात उतरले असुन भाजपाचे माजी उपसरपंच हुसेन पटेल असा सामना रंगणार आहे. प्रभाग २ मधील महाविकास आघाडीचे उमेदवार अप्पासाहेब रणसुरे हे बिनविरोध निवडून आल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. तर प्रभाग क्रमांक ३ ची लढत ही अतिशय चुरशीची आणी प्रतिष्ठेची होणार असून भाजपाच्या वतीने माजी सरपंच, उपसरपंच दत्तात्रय वडणे पुन्हा रंणागणात उतरले असुन त्याना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील तगडा उमेदवार रंणागणात उतरवला आहे.
दत्तात्रय वडणे यांनी मागील वेळेस काँग्रेसची सत्ता आणली होती परंतु वडणे हे अचानक राष्ट्रवादी मध्ये गेल्याने ग्रामपंचायतीचे सत्तापालट झाले होते तिथे ते उपसरपंच राहीले. त्यांच्याकडे सध्या पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, बाजार समितीचे संचालक, सोसायटी चेअरमन अशी दिग्गज मंडळी असताना सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी तरूण वर्ग एकत्र करून कडवे आव्हान उभे केले आहे .तसेच प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपाचे बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे मैदानात उतरले असुन महाविकास आघाडीच्या वतीने भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत हे लोंढे याना टक्कर देणार आहेत. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार असली तरी प्रभाग क्रमांक ३ च्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.