नळदुर्ग, दि. 04 : निलेगाव ता. तुळजापूर येथील दिव्यांग तुकाराम कदम यांनी सह्याद्रीचे सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल 5400 फूट प्रवास करत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांचा चेह-यावर ओसंडून वाहत होता. शिवुर्जा प्रतिष्ठानच्यावतीने नववर्षाच्या पूर्व संधेला दिव्यांग बांधवांना कळसूबाई शिखरसर करण्याची उपलब्ध करुन देण्यात आली होती. यात कदम यांच्यासह महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील 70 दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
गेल्या आठ वर्षापासून यशस्वीपणे महाराष्ट्रातील दिव्यांगांना दरवर्षी शिवुर्जा प्रतिष्ठानच्यावतीने ही संधी उपलब्ध करुन देण्यात येते. या मोहिमेत तुळजापुर तालुक्यातील दिव्यांग तुकाराम कदम हे सहभागी झाले आहे. मोहिमेतील सहभागी सर्व दिव्यांग बांधव कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहींगीरदारवाडी या गावात एकत्र आले होते. दि. 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता सर्वांनी शिखर चढाईला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, कळसूबाई माता की जय अशा घोषणा देत दिव्यांगांनी शिखर चढाईसाठी कूच केले. या मोहिमेत सहभागी दिव्यांग बांधम एकमेकांना आधार देत होते. रात्री 7 वाजता सर्वांनी कळसूबाई शिखराचा माथा गाठला. शिखरावर असलेल्या कडाक्याचा थंडीत सर्वांनी तंबूमध्ये मुक्काम ठोकला.
नववर्षाच्या पहाटे म्हणजे 1 जानेवारीला माथ्यावर असणा-या कळसूबाई मंदिरात त्यांनी कळसूबाईंचे दर्शन घेतले. तसचे उगवत्या सूर्याला नमस्कार करीत सर्व प्राणीमात्राला सुखी ठेव असे साकडे घातले. त्यानंतर सकाळी 10 वाजता परतीची वाट धरत खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी जहाँगीरदारवाडी गाव गाठले. विविध प्रकारचे दिव्यांग यात सहभागी झाले होते. सर्व सहभागी दिव्यांगाना शिवुर्जा प्रतिष्ठानच्यावतीने कळसूबाई शिखर यशस्वीपणे सर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.