तुळजापूर, दि. 04 : शहरात रस्ता करावे, पथदिवे बसवून ड्रेनेज लाईनवरील चेंबर दुरुस्त करण्याबाबत नगरसेवक सुनील रोचकरी यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिरापासुन शुक्रवार पेठ कडे जाणा-या रस्त्यावर पाय-या असून पार्किंगसाठी त्याचा उपयोग होत आहे. त्या पाय-यावरुन चालत जाता येत नाही. पाय-यांच्या दोन्ही बाजूला 5 फुटाचा रस्ता आहे. त्यावरील आणि पाय-यांवरील दगड निघुन खड्डे पडलेले आहेत व तो रस्ता जास्त गर्दीमुळे अपुरा पडत असल्यामुळे त्या दगडी रस्त्यामुळे ब-याच महिला, वयोवृध्द भाविक घसरुन पडण्याचा घटना घडत आहेत. काही अनुचित घटना घडल्यास सदर ठिकाणी असलेल्या पाय-यामुळे वाहनही जात नाही. त्याचा उपयोग फक्त आणि फक्त पार्किंगसाठी होत आहे. त्यामुळे येण्या-जाण्यास 5 फुटांचा रस्ता हा कमी पडत आहे. त्यामुळे तेथील पाय-या काढून रस्ता बनविणे योग्य होईल.
तसेच मागील पाच वर्षापासून शिवाजी चौक ते श्री तुळजाभवानी मंदिर ते शुक्रवार पेठ या महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी लाईटची सोय नाही. लाईट नसल्यामुळे सदर रस्त्यावर रात्रीच्या वेळी व पहाटेच्या वेळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भाविकांना व शहरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्काळ लाईटची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्याचबरोबर तुळजापूर शहरात प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या डेनेज लाईनवरील चेंबर हे काही ठिकाणी खराब झाले आहेत. त्यामुळे ब-याच भाविकांना व शहरवासियांना दुखापत झालेली आहे. त्यामुळे शहरातील ड्रेनेज लाईन वरील चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची एक प्रत माहितीस्तव तुळजापूर प्राधिकरणाचे सदस्य तथा आमदार व नगराध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत.