तुळजापूर,दि.१ : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे एनसीसी व एन एस एस विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच वाहतूक नियंत्रण, कार्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत  एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रशांत भांगे, वाहतूक नियंत्रक, उस्मानाबाद यांनी वरील प्रतिपादन केले.

  आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते पुढे म्हणाले की,रस्त्यावरील अपघांताचे प्रमाण कमी करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.अपघातातील मृत्यू मुळे कुटुंबांवर अनेक मोठी संकटे येत असतात.वाहन चालवत असताना खूप लहान लहान चुकांमुळे गंभीर परिणाम भोगावे लागत असतात.या चुका टाळण्यासाठी वाहन चालकांनी यथायोग्य पध्दतीने वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक असते.आपल्याकडे  रस्ते अपघातामुळे दरवर्षी दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात.त्यामध्ये ८० टक्के मृत्यू हे किरकोळ चुकांमुळे होतात.त्याचबरोबर यावेळी त्यांनी महामार्गावरील असलेल्या वाहतूकीच्या नियमांकरिता असलेल्या वेगवेगळ्या चिन्हांची माहिती उपस्थितांना दिली.विद्यार्थ्यांनी वाहन चालविण्यासाठी योग्य व अचूक प्रशिक्षण भविष्यात घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे अचुक नियम पाळावेत,एका दुचाकीवर तिघांनी प्रवास करु नये, तसेच संबंधित विभागाचा वाहन चालविण्यासाठीचा परवाना सोबत बाळगावा.सिटबेल्ट तसेच दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे.विनाकारण वाहनांचा वेग वाढविणे चुकीचे आहे असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.सी.सी विभाग प्रमुख प्रा डॉ मेजर वाय.ए.डोके यांनी केले,तर सूत्रसंचालन रासेयो विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच प्रा.डॉ.विलास गुंडपाटील,प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांच्या सह सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रमुख उपस्थित धर्मराज सरडे यांनी मानले.तसेच हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम.मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top