तुळजापूर, दि. १९: सतीश महामुनी
छत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी देवीच्या इतिहासावर आधारित भवानी तलवार अलंकार महापूजा शिवजयंतीच्या निमित्ताने तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी समोर मांडण्यात आली. यावेळी भाविकांनी मनोभावे भवानीमातेचे दर्शन घेतले.
तुळजापूर येथील श्री . तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये सलग तीन दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना केल्याचे चित्र मंदिर परिसरात दिसून आले. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंदिरचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे आणि इतर सहकारी गस्त घालताना दिसुन आले.
शिवजयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजेमध्ये भवानीमातेच्या भोपे पुजारी बांधवांनी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहे , महाराज ही स्वीकारत आहेत असा हा ऐतिहासीक देखावा होता. डाव्या बाजूला किल्ल्याची प्रतिकृती होती . तुळजाभवानी देवीच्या या भवानी तलवारच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा ऐतिहासिक दाखला या प्रसंगांमधून भाविक भक्तांना पहावयास मिळाला. दिवसभर भाविकांनी या ऐतिहासिक प्रसंगाचे दर्शन घेतले.