वागदरी, दि.१६ एस.के.गायकवाड
समाजातील व्यसनाधीनतेची होळी करून स्वतःचा व समाजाचा विकास करण्यासाठी पूरक अशा व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन बहुजन समाजातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे मत बहुजन रयत परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष , उद्योगपती रमेश गालफाडे यांनी नळदुर्ग येथे व्यक्त केले.
बहुजन रयत परिषदेच्या नळदुर्ग येथील विभागीय कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, बहुजन रयत परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, पत्रकार दयानंद काळुंके,माजी पं. स. सदस्य त्र्यंबक सूर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष राजकुमार गायकवाड, सुमित कोथिंबिरे , कमलाकर रणदिवे, दत्तात्रय गायकवाड ,सुनील क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना रमेश गालफाडे म्हणाले की, समाजातील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात युवकांनी एकजूट करून बंड करणे गरजेचे आहे ,बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेला आपला जीव की प्राण समजून कार्य करणे गरजेचे आहे, तेंव्हा युवकांनी गाव तेथे संघटना काढून समाजाचे संघटन वाढवून आपला विकास साधून घेण्याचे आवाहान शेवटी गालफाडे केले.
यावेळी हिप्परगा (ताड) येथील मातंग समाजाला दोन हजार लिटरची पाण्याची टाकी व त्याचे बेसमेंट करण्यासाठी व बाभळगाव येथील स्मशानभूमी वॉल कंपाऊंड करण्याकरिता बहुजन रयत परिषदेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी बहुजन रयत परिषदेच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या मीडिया सेलच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रकाश गायकवाड यांची निवड करून त्यांना कार्याध्यक्ष रमेश गालफाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी उमेश गायकवाड, सिकंदर शेख, विलास काळुंके, पुष्पक कसबे ,दिगंबर लोंढे, तानाजी बनसोडे, दिपक गायकवाड,उमेश वाघमारे, सत्यवान भोवाळ शशिकांत कसबे,व संजय महानुरे आदीनी यासाठी पुढाकार घेतला होता.