अणदुर आरोपिंना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशिल; महाविकास आघाडी प्रमुख रामचंद्र आलुरे
अणदूर , दि.३:
येथिल घटनेतील पिडित मुलीच्या व कुटुंंबियाच्या पाठीशी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य असल्याचे सांगुन आरोपिंना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे महाविकास आघाडी प्रमुख रामचंद्र आलुरे यांनी सांगितले आहे.
मंगळवारी महाविकास आघाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र आलुरे, बाळकृष्ण घोडके, डॉ. जितेंद्र कानडे, धनराज मुळे, डॉ. नागनाथ कुंभार, बालाजी घुगे व आघाडीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी सर्वांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. नूतन ग्रामपंचायतीच्या पहिल्याच बैठकीत अल्पवयीन अत्याचाराच्या घटनेच्या निषेधाचा ठराव घेवून सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी त्यांचे वकीलपत्र कुणीही घेवू नये,दोषींना गावात प्रवेशबंदी करुन भविष्यात अशा घटना पुन्हा होवू नयेत म्हणून दक्षता समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले.
टवाळखोर तरुणांचे अड्डे निश्चित करुन त्याला पायबंद घालणे,बस स्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्यासाठी प्रयत्न करणार असून पिडीता व कुटुंबाचे समुपदेशन करुन त्यांना आधार देत ग्रामस्थांनी त्यांना संरक्षण देण्याचे आवाहन करुन यामध्ये कुणीही राजकरण करु नये अशीही विनंती करण्यात आली.