जळकोट,दि१३:मेघराज किलजे
   'नाते शब्दांचे साहित्य मंच ' या व्हॉट्सॲप समूहाचे पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन दि.७ फेब्रुवारी रोजी लायन्स क्लब ऑफ ,कोपरगाव संचलित श्रीमती यमुनाबाई वाघ सभागृह कोपरगाव ( जि.अहमदनगर ) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 

संमेलनास संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये , विशेष उपस्थितीत नगराध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक  विजयराव वहाडणे , कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना  पद्मकांत कुदळे , उपाध्यक्ष महानंदा राजेंद्र जाधव ,जेष्ठ साहित्यिक सुधीर( राजेंद्र) कोयटे , पत्रकार प्रकाश कुलथे , साहित्यिक शिवाजी काळे ,जेष्ठ साहित्यिका तथा समाजसेविका श्रीमती वनमाला पाटील,जेष्ठ कवी तथा समाजसेवक शैलेंद्र भणगे, कवी तथा समाजसेवक बाळासाहेब गिरी, षटकोळी निर्मितीकार संध्याराणी कोल्हे, सिनेअभिनेता, गीतकार तथा समाजसेवक  गुलाबराजा फुलमाळी आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमास ख्वाडा व बबन चित्रपट फेम अभिनेत्री स्नेहल भांगे या आवर्जून उपस्थित होत्या.

        महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तब्बल ५५-६० कवी / कवयित्रीनी या काव्य संमेलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व कवी, कवयित्रीनी आपापल्या कवितांनी पूर्ण दिवस सभागृह आनंदी व प्रसन्न ठेवले.विविध काव्य प्रकार, विविध आशय, ढब आणि शैलीत कवितांनी रंगत आल्याने प्रत्येक कवितेला उपस्थितांकडून दाद मिळत होती, त्यांच्या त्याच कवितेचा सन्मान व्हावा म्हणून प्रत्येक कवी / कवयित्रीस सन्मानपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. काव्य संमेलनात कवयित्री श्रीमती वनमाला पाटील यांच्या ' खान्देश ना खजिना ' या अहिराणी काव्य संग्रहाचे प्रकाशन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हिरकणी साहित्य गौरव समूहतर्फे या संमेलनात कवयित्री सौ.चंदन तरवडे, कवयित्री प्रतिभा बोबे, कवयित्री रेखा बावा यांना ' हिरकणी साहित्य गौरव पुरस्कार ' तर कवी ज्ञानेश्वर शिंदे यांना ' काव्यरत्न ' हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

         ' नाते शब्दांचे साहित्य मंच' समूहाच्या लोगोची आणि प्रवेशद्वाराची रांगोळी सर्वांचे स्वागत प्रेमाने करत होती.सर्व कवी, कवयित्रीचे सर्वप्रथम स्वागत करण्यात आले, सर्वांच्या अल्पोपहाराची दोन वेळेस यथोचित व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वन करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना समूह प्रमुख कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी समूह सुरू केल्यापासून ते आजपर्यंतचा प्रवास मांडला. हे संमेलन नसून एक साहित्यिक मेळा, साहित्य स्नेह गोतावळा आहे, ते एकत्र आणण्याचे माध्यम तसेच नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, साहित्य सेवेत योगदान देणे व शब्दांमुळे जुळलेले नाते अधिक घट्ट व्हावे यासारख्या उदात्त हेतूने हे संमेलन आयोजित केल्याचे व याहीपुढे संमेलनाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.  नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी आपल्या अतिशय मार्मिक चारोळ्या, कविता सादर करून संमेलनात नवचैतन्य भरले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपापल्या मनोगतात साहित्यविषयक बोलत संमेलनाचे भरभरून कौतुक केले. 

      अध्यक्षीय भाषणात  डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी साहित्यविषयक सखोल मार्गदर्शन केले. जेष्ठ साहित्यिक कवी सुधीर कोयटे यांनीही आपल्या विडंबन कवितांनी सभागृह खिळवून ठेवले. 
      कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदिका  राजश्री पिंगळे यांनी आपल्या अतिशय गोड आवाजाने आणि आपल्या लयदार शब्दांनी सर्वांवरच शब्दांची मोहिनी घातली तर तितक्याच ताकदीने दुपार सत्रात कवी व निवेदक नंदकिशोर लांडगे यांनी संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर सांभाळली.

         संमेलनामध्ये कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी संमेलनावर आधारीत एक कविता व  आपली स्वरचित कविता "नाते युगायुगांतरीचे"  या दोन्ही कविता सादर करुन सर्व उपस्थितांचे मने जिंकले.
 
Top