शहरातील सर्वे नंबर २९ मध्ये अतिक्रमण करून राहत असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या जागेत रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ द्यावा, या मागणीसाठी दि.१७ मार्च रोजी पासुन रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी नळदुर्ग न.प.कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही नळदुर्ग येथील कायमचे रहिवासी असुन आम्ही सर्वे नं.२९ मध्ये गेल्या ५० वर्षापेक्षा जास्त काळापासुन शासकीय गावठाण जागेवर राहत आहोत. आम्ही सर्वजण अनुसुचित जाती बौद्ध घटकातील असुन आमची चौथी पिढी सध्या याठिकाणी राहत आहे.राज्यात सुरू असलेली रमाई घरकुल योजना ही अतीशय चांगली आहे.
मात्र नळदुर्ग शहरात ही योजना राबविण्यास नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व मालकीचे घर असावे म्हणुन शासन दरबारी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. यासाठी निवेदन देणे,आंदोलन व उपोषणही करण्यात आले, मात्र या मागासवर्गीय लोकांचा आजपर्यंत कुणीच विचार केला नाही.दि.१/१/१९९५ च्या अगोदर पासुन शासकीय गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या अतिक्रमणधारकांना त्याच ठिकाणी कायम करा असा शासकीय आदेश असतांना नगरपालिकेने मात्र याठिकाणी आम्हाला कायम केले नाही,
दलित वस्तीमध्ये रमाई आवास घरकुल योजना राबविण्यात आली मात्र कांही मोजक्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु अतिक्रमणधारकाना या योजनेचा लाभ मिळाला नाही. दलित वस्तीमधील अतिक्रमणधारकांना भोगवटदार म्हणुन घोषित करून ते राहत असलेल्या ठिकाणीच रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवुन द्यावा.दि.१५ मार्च पर्यंत हा प्रश्न सोडवुन रमाई आवास घरकुल योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा दि.१७ मार्च २०२१ पासुन आम्ही न.प.कार्यालयासमोर सर्व नियमांचे पालन करूनआमरण उपोषणास बसणार आहोत. यावेळी उपोषणकर्त्यांना कुठली इजा झाली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक उस्मानाबाद , तहसिल कार्यालय तुळजापुर, न.प.कार्यालय नळदुर्ग व पोलिस ठाणे नळदुर्ग यांनाही देण्यात आले आहे. या निवेदनावर पत्रकार दादासाहेब बनसोडे, प्रकाश बनसोडे, राजेंद्र कांबळे, बाबासाहेब बनसोडे, नामदेव बनसोडे,अमर बनसोडे, सुमनबाई गायकवाड, सुभाष कांबळे व शक्ती कांबळे यांच्यासह ४० लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.