तुळजापूर , दि. २५ :
तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. यावेळी सभापती म्हणून सौ रेणुका इंगोले आणि उपसभापती म्हणून शरद जमदाडे यांनी विजय संपादन केला.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा दिला होता. तुळजापूर नगरपरिषदेच्या पॅटर्न प्रमाणे सभापती आणि उपसभापती पदासाठी इतर सदस्यांना संधी देण्याचे आश्वासन यापूर्वी दिलेले होते.
तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाचा एक सदस्य शिवाजी साठे काडगाव गण हे अनुपस्थित राहिले. सभापतीपदासाठी भाजपाकडून सौ रेणुका इंगोले व काँग्रेसकडून सौ वैशाली मुळे तर उपसभापती पदासाठी भाजपाकडून शरद जमदाडे आणि काँग्रेसकडून सौ. सोनाली बनसोडे यांनी आपली उमेदवारी अर्ज भरले होते. यावेळी भाजपच्या ९ आणि काँग्रेसच्या ८ सदस्यांनी मतदान केले. दोन्ही जागेसाठी एक मतांनी विजय मिळवून आमदार राणाजगजितसिंह पाटील वरचढ ठरले आहेत.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड आनिल काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस वसंत वडगावे, तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, ॲड. दीपक आलुरे, बापू कने, चैतन्य सरडे, विक्रम देशमुख, विजय शिंगाडे, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .