नळदुर्ग, दि.८ : विलास येडगे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने दिंडेगाव ता. तुळजापुर येथील महाशिवरात्री निमित्त भरणारी शिवरामबुवा महाराजांची यात्रा रद्द करण्यात आली असुन दि.११ ते १३ मार्च या कालावधीत भाविकांनी दिंडेगाव येथे येऊ नये असे आवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी केले आहे. 

तुळजापूर  तालुक्यातील दिंडेगाव येथे महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या श्री शिवरमबुवा महाराजांच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. वारकरी संप्रदायाची ही यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठया उत्साहपूर्ण वातावरणात भरते. ही यात्रा सलग तीन दिवस भरते या यात्रेत वारकरी तसेच इतर भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा धोका तसेच सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने भाविक तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही यात्रा रद्द केली आहे. 

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत याठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यात्रेदिवशी मंदिर परीसरात भाविकांना प्रवेशदिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी यावर्षी श्री शिवरमबुवा महाराज यांच्या यात्रेला दिंडेगाव येथे येऊ नये असे आवाहन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी केले आहे. 

प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय हा वारकरी व भाविकांच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. त्यामुळे वारकरी व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे वारकरी व भाविकांनी दि.११,१२ व १३ मार्च २०२१ या कालावधीत दिंडेगाव येथे येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. श्री शिवरमबुवा महाराजांची यात्रा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
Top