तामलवाडी, दि.१८ : 
 महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दैनंदिन कामकाजात जागरण गोंधळ घातल्याची रसभरीत नागरिकात चर्चा होत  आहे.  आपल्याच विभातील कोतवाली कर्मचाऱ्यांस दिवसरात्र राबवुन घेण्याचा सपाटा लावल्याचे समजते. 

 स्थानिक गावपातळीवरिल महसूल विभागाची कामे तातडीने व्हावी व शासनाच्या वेगवेगळ्या योजना, सरकारी आदेश तत्काळ गावकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी शासनाने महसूली सज्जा निहाय कोतवालांची नेमणूक केलेली आहे. कोतवालांनी सज्जाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना तुळजापूर तहसिल कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने कोतवालांना बेकायदेशीर रित्या तहसिल कार्यालयात दैनंदिन कामकाजासाठी जुंपले आहे. तुळजापूर तहसिल कार्यालया अंतर्गत 37 कोतवाल कार्यरत असून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पिळवणूक सुरू आहे. 

वेळेत मानधन न देणे, प्रवास भत्ता न देणे, नागरिकांसमोर कोतवालांना अर्वाच्य भाषेत बोलणे ,अशा घटना नित्यानेच होत असल्याने कोतवालांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


कोतवाल हे महसूल विभागातील कनिष्ठ पद असून कोतवालांना महसूल विभाग व गावकरी या दोन्ही मधला महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. शेतसारा वसुल करणे, विविध सरकारी आदेश गावकऱ्यांपर्यंत पोहचविणे, दवंडी पिटवणे, तलाठी कार्यालयातील कामे करणे, यांसारख्या कामांसाठी महसूल विभागात अनेक वर्षांपासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. 

तलाठ्यांचे सेवक म्हणून खेडोपाड्यात जावून काम करण्यासाठी कोतवालपदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. नेमून दिलेल्या तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, तहसील कार्यालयात कोतवालांना अधिकाऱ्यांचे सेवक म्हणून राबविण्यात येत आहे. तुळजापूर तहसिल कार्यालय परिसरात रात्रपाळीसाठी पहारेकरी म्हणून सात कोतवालांची नियुक्ती केलेली आहे. तहसिलदारांच्या नावाखाली इतर कर्मचारी देखील कोतवालांना राबवून घेत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

 तुळजापूर तालुक्यातील कोतवालांना विधानसभा, लोकसभा निवडणूकीचा अद्यापही भत्ता मिळालेला नाही. तसेच मंडळनिहाय टपाल वाटप करणाऱ्या कोतवालांना गत दिड वर्षापासून प्रवास भत्ता दिलेला नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा व प्रपंच भागवण्यासाठी कोतवालांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कोतवालांची होणारी पिळवणूक थांबवावी व दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी कोतवालांसह सर्वसामान्य नागरिकांतुन होत आहे.
 
Top