तुळजापूर, दि. २३:
येथील तुळजाभवानी मंदिर मार्गावर आंबेडकर चौकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या रेखांकन मंजुरी मिळाली असून लवकरच दिमाखदार पुतळा उभा करण्यात येईल अशी माहिती नगरसेविका सौ वैशाली तानाजी कदम यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
अनेक वर्षापासून पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीसाठी रिपाई कडून तसेच आंबेडकरवादी संघटनेकडून मागणी करण्यात येत होती.
तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाचे वास्तुविशारद स.वा.गेडाम यांनी १८ मार्च रोजी सदर पुतळ्याच्या रेखाकनासाठी मान्यता दिली आहे.
तुळजापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विनोद गंगणे, नगराध्यक्ष , मुख्याधिकारी यांच्या सहकार्याने व रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव आविनाश महंते,साहित्यिक वैभव काळखेर, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, रिपाइं तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम आदींनी संबंधित वास्तुविशारद मुंबई येथे जाऊन पाठपुरावा केल्याने सं.वा.गेडाम मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा चबुतरासह उभारण्यास मंजुरी दिली.
त्यामुळे लवकरच तुळजापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पू्र्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका वैशाली कदम यांनी दिली.
तुळजापूर नगरपरिषदेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रश्नासाठी लक्ष घातले आणि नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी यासाठी योगदान दिले आहे हा पुतळा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारा आहे, राज्यशास्त्राचे आम्ही या निमित्ताने आभार मानतो अशी प्रतिक्रिया नगरसेविका सौ. वैशाली कदम यांनी दिली.