तुळजापूर, दि. १०: डॉ सतीश महामुनी
पीक विम्यासाठी जाचक असणाऱ्या अटी दूर करुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी मुंबई येथे विधानसभा अधिवेशन सुरु असताना राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व पीक वाहून गेले. पिकाबरोबर जनावरे शेतातील माती हे देखील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले . याशिवाय शेतामधील विहीर गाळाने भरून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा पंचनामा कृषी कार्यालयामार्फत करण्यात आला. मात्र त्यानंतर बजाज कंपनीने निर्धारित 72 तासाच्या कालावधीमध्ये सदरील पंचनामे अपलोड न केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचा फायदा मिळू शकत नाही. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, हा फेटाळलेला पिक विमा मंजूर होण्यासाठी राज्य सरकारने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निवेदनात केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून या विषयांमध्ये सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, वास्तविक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या चुका मुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेले आहेत. म्हणून पिक विमासाठी आवश्यक असणाऱ्या जाचक अटी तातडीने दूर करून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात अतिवृष्टी मध्ये शेतामधील माती वाहून गेल्यामुळे व विहिरी गाळाने भरून गेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी पंचनाम्याच्या अनुषंगाने आपण सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून माहिती मिळवत असताना तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आपण मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे मागणी केल्याचे म्हटले आहे.