वागदरी ,दि.४ : एस.के.गायकवाड
नळदुर्ग ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर चिवरी पाटी ते हगलुर(ता.तुळजापूर) दरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे.तर वाहनचालकाना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा या भागात अपघात झाल्याचे सर्वश्रुत आहे.
राज्यासह परराज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविक या मार्गाने सर्वाधिक संख्येने जातात.
नळदुर्ग ते तुळजापूर या महामार्गावर भावीक भक्तांच्या वहानाची नेहमीच वर्दळ असते. शिवाय हा रस्ता औरंगाबाद ,नगर,शिर्डी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे माल वहातुक करणाऱ्या वहानाची ही मोठी वर्दळ या रस्त्यावर असते.
आशा वर्दळीच्या या महामार्गावर चिवरी पाटी ते हगलुर पाटी दरम्यान मोठ मोठे खड्डे पडले असून संबंधित प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष होत आहे.
हे खड्डे चुकविण्याच्या नादात वहानावरील ताबा सुटल्याने वारंवार अपघात होत आहेत.
शासन एकीकडे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हायवे मृत्युजय दुत योजना राबवित आहे. पण ज्या खड्डेरूपी यमदूतामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे ते खड्डे बूजविण्याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करताना दिसत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर नळदुर्ग ते तुळजापूर या रोडवरील चिवरी पाटी ते हगलुर पाटी दरम्यान पडलेले खड्डे त्वरित बुजवावे असी मागणी होते आहे.