उमाजी गायकवाड,पञकार
कुटुंबाला आकार देणारी सर्वात महत्वाची व्यक्ती ही त्या परिवारातील महिला असते. तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानीच्या पावन वास्तव्याने पुनित झालेलं शहर, यामुळेच या शहरात प्रचंड ऊर्जा नांदते .विविध राज्यातून भाविक या ठिकाणी येतात. शहरातील मुख्य व्यवसाय हा येथे येणाऱ्या भाविकांना सेवा देणे हा आहे.
येणाऱ्या भाविकांची वेळ आणि पडणारे काम याचे वेळापत्रक करणे जवळ जवळ अशक्य. तुळजापूर येथील प्रत्येक कुटुंबात महिलांना असणारे काम हे मोठ्या प्रमाणात असते. कुटुंबातील उत्पनात जेवढा पुरुषांचा वाटा त्यापेक्षा जास्त हा महिलांचा इथे पहायला मिळतो. दिनचर्या पाहता विश्रांती हा प्रकार येथील महिला मध्ये कमीच. बाहेर जाऊन शॉपिंग किंवा हॉटेलिंग हा विषय तर महिलांचा नाहीच कि काय आसे वाटते. जेव्हा जेव्हा शिक्षण व संस्कार याची चर्चा होते तेव्हा एका कुटुंबाचा उल्लेख प्रत्येक तुळजापूरकर करायाल विसरत नाही. त्या अमृतराव-कदम परिवारातील सौ. सुंदरताई यांचा शब्द्पाठ माहिला दिनी मांडणे औचित्याचे ठरेल.
मंदिराच्या शेजारी असणारे घर आणि केव्हाही येणारी यात्रा. व्यवसाय महत्वाचा असल्याने भक्तांची सेवा हेच मुख्य उद्दिष्ट. येणारे भाविक पिढ्यानपिढ्या येत असल्याने “नको” म्हणणे हा प्रश्नच येत नाही. यात कुठेच शिक्षणाला वाव नाही, मग ना पोषक वातावरण, ना कुठली प्रेरणा. घरी तसं शिक्षण प्रमाणातच पण परिस्थितीला सर्वात मोठा गुरू मानून आयुष्यकडे पाहणारी स्त्री काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सौ. सुंदरताई यांचा मूळच्या चंद्रभागेच्या तिरावरून सुरु झालेला हा प्रवास भक्ती पीठ ते शक्ती पीठ तुळजापूर असा आहे.
मूळता: लहानपणा पासून वडील कै. ज्ञानेश्वर रामराव पाटील यांचा गावगाडा चालवण्याची शिकवण अंगाशी असल्याने त्याचाच उपयोग अमृतराव कुटुंबात आलेल्या सुंदरताई यांनी केला. विचार व त्यासोबत आचार हे दोन्ही जीवनाचे आधार असतात. याचाच धागा पकडून मुलांना आपण शैक्षणिक दृष्ट्या श्रीमंत केले पाहिजे हे मनाशी ठाम केले व बालपणापासून शिक्षणाचे वातावरण प्रथम घरी निर्माण केले व मुलांना शिक्षणात गोडी निर्माण केली. घरची व व्यवसायाची सर्व कामे करून शिक्षनणाला महत्व दिले. शिक्षणाचे कसलेही पूरक वातावरण नसलेल्या ठिकाणी, त्यांची आज दोन्ही मुले पीएच. डी. होल्डर केलेली असून ते दोघेही मोठ्या हुद्द्या वरती कार्यरत आहेत.
तुळजापूर मध्ये एका कुटुंबातील दोन सख्खे भाऊ डॉक्टेरेट करणे हि सोपी गोष्ट नाही. मोठा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, उस्मानाबाद येथे व्यवस्थापन शास्त्र विभागाचा संचालक आहे तर दुसरा हा भारतातील नामांकित कंपनी टी सी एस मध्ये मोठ्या पदावरती आहे. एका आईच्या संस्काराने व तत्वज्ञानाच्या शिदोरीने छोट्या शहरातील मुले आपला ठसा मोठ्या शहरात पाडू शकतात हे यामधून समजू शकते. दोन्ही मुलांनी देशात परदेशात देखील कार्य केले आहे. तसेच पुढे त्यांनी सूनेला देखील नोकरी करण्याची संधी दिली आणि ती देखील मोठ्या कंपनी मध्ये कार्यरत आहे. सर्व परिवार व्यसन मुक्त ठेवणे हे देखील तुळजापूर परिसरात मोठे जिकीरीचे होते.
या सर्वाचा पाया होता तो सौ. सुंदरताई यांनी कुटुंबात रुजवलेले आचार आणि विचार म्हणून या कथेचे महत्व अधिक आहे. त्या स्वता माॕ साहेब जिजाऊ यांना आदर्श मानतात. कीर्तन करणे व कविता लिखाण हा त्यांचा छंद आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी बऱ्याच वेळेस "सामाजिक मॉडेल" कोण बनायचं असा प्रश्न पडतो तेव्हा अशी कुटुंब उदाहरण देत असतात. हे सर्व करण्यात सौ.सूंदरताई यांचा वाटा मोठा असल्याने त्यांना याचा आनंद आहे.
श्री. तुळजाभवानी स्त्री शक्तीचे मोठे स्थान मानले जाते म्हणूनच महिला दिना निमित्त तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी पुजारी कुटुंबात “शिक्षणाचे सुंदर संस्कार” रुजवणारी महिला म्हणून आपला आम्हास अभिमान आहे.