तुळजापूर, दि. ६ :
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्यावतीने भक्कम बाजू मांडवी , युक्तिवाद करण्यासाठी परिपूर्ण तयारी करून सरकारने आरक्षणाच्या लढ्यामध्ये यश देण्याची मागणी तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 8 मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याची पूर्व तयारी सरकारने पूर्ण करावी, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी ठेवू नये व तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन साळुंके, जीवनराजे इंगळे, महेश गवळी, अजय साळुंके, अर्जुन साळुंके, धैर्यशील कापसे, प्रतीक रोचकरी, प्रशांत अपराध, अशोक फडकरी, कुमार टोले, आप्पासाहेब पवार, अण्णासाहेब शिरसागर , दिनेश बागल, किशोर पवार यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या निवेदनामध्ये मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाचा विषय लवकरात लवकर सोडून उच्चशिक्षित मराठा समाजातील मुलांना नोकरी मध्ये आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये योग्य न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारने अत्यंत गांभीर्याने आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक सज्जन साळुंखे म्हणाले की, कायदेशीर त्रुटी न ठेवता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने परिपूर्ण आणि आरक्षण मंजुरीसाठी आवश्यक उपाययोजना करून आरक्षणाचा लढा मध्ये यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदीर्घकाळ मराठा समाजाने आरक्षणासाठी संघर्ष केला आहे पन्नास तरुणांचे बलिदान यासाठी दिलेले आहे याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने या विषयांमध्ये सर्वशक्तीनिशी आणि पूर्व तयारीनिशी न्यायालयामध्ये युक्तिवाद करावा असेही नमुद केले आहे.