तुळजापूर, दि. ४ :

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नुकत्याच झालेल्या विद्यापीठ अधिसभा बैठकीत, कोरोना काळात ज्या सत्राच्या परीक्षा झाल्या नाहीत, परंतु त्यांचे शुल्क विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आले ते शुल्क विद्यार्थ्यांना परत करणे गरजेचे आहे, तरी सदर सर्व विद्यार्थ्यांना शुल्क कधी परत करण्यात येणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता.


यावर विद्यापीठ कुलगुरूंनी याबाबत शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर दिलेले होते. या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विधान भवनात भेट घेऊन या विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की,
महाराष्ट्रातील विद्यापीठ अंतर्गत कोरोना काळात घेण्यात आलेल्या पदवी व पदवुत्तर विभागाच्या सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म व परीक्षा शुल्क सर्व विद्यापीठांकडून भरून घेण्यात आले होते, परंतू सर्वोच्च न्यायालय व युजीसीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने केवळ अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊन इतर सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार विद्यापीठांनी फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन उर्वरित सत्राच्या (1 ते 5)  सेमिस्टरच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यास पात्र केलेले आहे. परंतु विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केलेले आहे. 

यामुळे ज्या सत्राच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करणेबाबत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना निर्देशीत करावे, अशी मागणी केलेली आहे.

या अनुषंगाने उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांना सदर प्रकरणाचा अभ्यास करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशात केले आहे.
 
Top