तुळजापुर , दि.१३:
 दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात आणि कोरोनाचा प्रतिबंध करण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे  मत जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी  व्यक्त केले.


उमरगा व तुळजापूर तालुका दौऱ्यावर असताना शाळा,  अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत,  पशुवैद्यकीय दवाखाने आणि पंचायत समिती कार्यालयास भेटी देऊन तेथील कामाची पाहणी करीत असताना फड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांनाही भेटी दिल्या. आरोग्य केंद्रात कोरोनाच्या अनुषंगाने घेतल्या जात असलेल्या रुग्णांच्या चाचण्यांची आणि  कोरोनाच्या लसीकरणाची  पाहणी त्यांनी या दौऱ्यात केली.  

 रुग्णांशी संवाद साधून आरोग्य केंद्रातून त्यांना मिळणाऱ्या सेवांबाबत , कर्मचाऱ्यांच्या  वागणुकीबाबत विचारपूस केली . यावेळी  रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या उतरांमुळे  डॉ . फड यांनी समाधान व्यक्त केले. 

  कोरोना प्रतिबंधाबाबत  प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून केले जात असलेले  मार्गदर्शन तसेच कोरोना संशयित रुग्णांचे घेतले जात असलेले नमुने आणि कोरोना प्रतिबंधासाठी दिले जात असलेल्या लस कामातील प्रगतीही कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .  

कोरोना साथीच्या प्रतिबंधाच्या कामांत  उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावत असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामांचे डॉ .फड यांनी कौतुक केले.

   
आरोग्य केंद्रातील अंतर्गत स्वच्छता,  औषधी आणि साहित्याची उपलब्धता, रुग्णांना दिले जात असलेल्या सोयी सुविधांची व प्राथमिक   आरोग्य केंद्राच्या बाह्य परिसराची डॉ .फड यांनी पाहणी केली. 

यावेळी आंतरबाह्य स्वच्छतेबरोबरच वृक्ष लागवडीवरही भर देण्याबाबत त्यांनी  सूचना दिल्या.यावेळी डॉ . फड यांच्या सोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, तुळजापूरचे गट विकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, डॉ.अमित कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास साळुंके, डॉ.सुभाष पवार, डॉ.आकांक्षा गोरे, डॉ.विष्णू सातपुते, समाधान जोगदंड,   मेघराज पवार आदी उपस्थित होते.
 
Top