उस्मानाबाद, दि.13 :
कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी कोरोनाची लस तात्काळ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व सामान्य नागरिकांकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग मार्फत मोफत लस वितरित करण्यात येत आहे.
कोरोनावरील लस ही सुरक्षित आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. याबरोबरच जास्तीत जास्त लोकप्रतिनिधीनी सर्व सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन श्रीमती कांबळे यांनी केले आहे.
जिल्हयातील पोहनेर, मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जेष्ठ नागरिकांकरिता कोरोनावरील मोफत लस देण्याचा कार्यक्रम श्रीमती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पोहनेर येथील लसीकरण सत्रात 80 वर्षावरील दोन महिलांनी लसीकरण करुन घेतल्याबद्दल त्यांच्या हस्ते सन्मान व कौतूक करण्यात आले. प्रत्येक आरोग्य केंद्रावर आठवडयातून दोन वेळेस लस देण्याच्या सूचना श्रीमती कांबळे यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.
नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अद्याप लसीकरण सुरु का झाले नाही, याबाबत त्यांनी विचारणा केली असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जानराव यांनी विविध अडचणी येत असल्याबाबत माहिती दिली आणि लसीकरणासाठी इमारत अद्यावत नसल्याचे सांगितले. त्यावर दोन दिवसांत लसीकरण सत्र सुरु करण्याबाबतचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना देवून त्या ठिकाणी प्रती दिन लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्याविषयी सूचना दिल्या. आरोग्य यंत्रेणेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही गावोगावी याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. गावागावातील निराधार, झोपडपट्टया, तांडा वस्ती येथील वयोवृध्द नागरिकांना स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधीनी लसीकरण सत्रास त्यांना आणण्यासाठी मदत करण्याची गरज असल्याची अपेक्षा यावेळी श्रीमती कांबळे यांनी व्यक्त केली .
या लसीकरण कार्यक्रमास जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, पोहनेर (ता. उस्मानाबाद) चे सरपंच श्रीमती उपासना धावारे व मंगरुळ (ता. तुळजापूर) सरपंच सौ. विजयालक्ष्मी डोंगरे, उपसरपंच गिरीष डोंगरे, उस्मानाबाद तालुका आरोग्य अधिकारीडॉ.अमोल सूर्यवंशी, तुळजापूर आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, वैद्यकीय अधिकारी महेश गुरव, डॉ. संतोष पवार, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.