नळदुर्ग,दि.७ :  
 कोरोनाग्रस्त आपत्तीच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व नाममात्र खर्चात लग्न सोहळे होत असताना शाळेत शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींचे शिक्षण थांबवून कमी वयात लग्न सोहळे उरकण्याचे निदर्शनास येत असल्याचे लक्षात येताच बालविवाह ही एक गंभीर समस्या असून महिलांवरील होणाऱ्या हिंसेचा तो कडेलोट आहे.

  वाईट प्रथा व मानसिकता थांबली पाहिजे, या मानसिकतेतून अणदूर ता.तुळजापूर येथील हॅलो मेडिकल फौंडेशन  व सखी वन स्टॉप सेंटर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील लोहारा व तुळजापूर तालुक्यातील ७० गावातून बालविवाह प्रतिबंध अभियान राबविले जात आहे.

विशेषतः २०२० मध्ये झालेल्या एकूण विवाहापैकी मराठवाड्यात जवळपास ५० टक्के विवाह हे बालविवाह झाले असल्याचे हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या अभ्यासातून निदर्शनास आले.  याबाबत संबंधित सर्व विभागाची दि.  १७ फेब्रुवारी रोजी बैठक बोलावून जिल्हाधिकारी दिवेगावकर यानी ही सतर्कतेच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर ही बाब खूप चिंताजनक व गंभीर असल्याने "निर्धार समानतेचा" या प्रकल्पाच्या माध्यमातून हे बाल विवाह रोखले जावे यासाठी  जनजागृती करण्याचे काम या प्रक्रियेतून चालू आहे.


 बालविवाह म्हणजे १८ वर्षाच्या आत मुलींचे आणि २१ वर्ष्याच्या आत मुलांचे विवाह होणे.
हा बालविवाह म्हणजे मुलांमुलींवर झालेला अन्यायच म्हणावा लागेल.

 विशेषतः याचे दुष्परिणाम हे अल्पवयीन मुलींवर तीव्र होत असतात. हा एक महिलांवर होणाऱ्या हिंसेचा कडेलोट आहे.



अश्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखले जावे यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील  हॅलो मेडिकल फाऊंडेशन ही संस्था सध्या जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंधक अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे.


जिल्ह्यातील ७० गावातुन दि. १ मार्च ते ३० मार्च  याकाळात   गावातील पुरुष , महिलां, युवक तसेच युवतीं यांच्या बैठका घेऊन  बालविवाह बाबतीत  जनजागृती करत आहे.


ज्या काळात आपली मुले, मुली  शिक्षण घ्यायला हवी, त्या काळात आपण त्यांना विवाहाच्या जाळ्यात अडकवू नये , यासाठी कला पथकाच्या माध्यमातून पोवाडे, पथनाट्य, गावकऱ्यांशी संवाद, किशोरवयीन मुलींच्या बैठका तज्ञांचे मार्गदर्शन, गावात भिंतीवर म्हणी लिहिणे, ध्वनिफीत व चित्रफीत संशयित कुटुंबाचे, युवक , युवतीचे समुपदेशन,  या गोष्टींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

 या सर्व प्राक्रियेत कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करत डॉ शशिकांत अहंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सतीश कदम , वासंती मुळे ,  श्रीकांत कुलकर्णी, स्वाती पाटील, अनुराधा पवार, शिवानी बुलबुले आदीं  परिश्रम घेत आहेत.
 
Top