नळदुर्ग,दि.१० :विलास येडगे
नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्गा शेजारी वसलेलं शहर आहे. नळदुर्ग शहराची लोकसंख्या जवळपास २५ हजार इतकी आहे. नळदुर्ग शहरातील स्मशानभूमी शहरापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. शहरात मयत झाली तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहराबाहेरील आलियाबाद येथील स्मशानभुमीत जावे लागते. हे अंतर पार करीत असताना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. ही चर्चा अनेकवेळा होत होती म्हणूनच नागरीकांच्या सोयीसाठी आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नळदुर्ग शहरात अंत्ययात्रेसाठी "वैकुंठ रथ" उपलब्ध व्हावे, यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य गेल्या २ महिन्यांपासुन प्रयत्न करत होते.
वैकुंठ रथ हा संस्थेचा महत्वकांक्षी उपक्रम आता प्रत्यक्षात मार्गी लागला असुन हा "वैकुंठ रथ" येत्या दोन दिवसांत नळदुर्ग शहरातील सर्व नागरीकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.
वैकुंठ रथ बनवीत असताना रथासाठी लागणारे सर्व साहित्य हे नळदुर्ग शहरातच खरेदी करून नळदुर्ग शहरातील उद्योग व्यवसायाला मदत व्हावी ही संकल्पना या उपक्रमाच्या माध्यमातुन राबविण्यात आली आहे. आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्य मोठे आहे. कोरोनाच्या काळात आरंभ संस्थेने शहरासह परीसरातील गरजु गरीब नागरीकांना अन्न धान्याचे किट तसेच मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिकम गोळ्यांचे मोफत वाटप करून नागरीकांना आधार देण्याचे काम केले. आरंभ सामाजिक संस्था हातात घेतलेले काम पुर्णच करते हे या संस्थेने अनेकदा दाखवुन दिले आहे.
नळदुर्ग शहरात मरण पावलेल्या व्यक्तींवर अंत्यविधी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो एकतर अलियाबाद ही हिंदु स्मशानभुमी शहरापासुन बऱ्याच लांब अंतरावर आहे. त्याठिकाणी प्रेत घेऊन जायचे म्हटले तर वाहनाशिवाय पर्याय नाही, अशा वेळी खासगी वाहन ,मालक एकतर अशा कामाला वाहन द्यायचे टाळणे किंवा भाडे आवाच्य सव्वा सांगणे, यामुळे गरीबांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
शहरात अनेक धनदांडगे व्यक्ती आहेत वैकुंठ रथ तयार करावे, यावर बऱ्याचदा चर्चा झाली. मात्र प्रत्येक वेळी या चर्चा वांझोटयाच ठरल्या. वास्तविक पाहता शहरांतील नागरीकांच्या सोईसाठी नगरपालिकेने फार वर्षापूर्वीच हा वैकुंठ रथ उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र नगरपालिकेला ते जमले नाही, शहरांतील धनदांडग्याना ते जमले नाही. मात्र आरंभ सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी ते करून दाखविले आहे. आज आरंभ सामाजिक संस्थेचा वैकुंठ रथ येत्या दोन दिवसात शहरवासीयांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. आरंभ सामाजिक संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.