तुळजापूर, दि. ११ :
सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असुन उस्मानाबाद जिल्ह्यातील परस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने रविवारी तुळजापूर शहराला भेट देवुन उपाय योजनांची पाहणी केली.
केंद्र शासनाच्यावतीने नियुक्त केलेल्या पथकामध्ये डॉ.शर्मा व डॉ.शेळके यांचा समावेश होता. त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी खरमाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड, तहसीलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे, मंदिर जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे याप्रसंगी उपस्थित होते.
या पथकाने तुळजाभवानी मंदिर महाद्वार पासूनच दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा मंदिर कार्यालयात तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. मंदिरासमोर त्यांनी कोरोना परस्थितीची माहिती घेतली.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लोकरे यांनी तुळजाभवानी मंदिर परिसर , तुळजापूर तीर्थक्षेत्र हे मोठ्या गर्दीचे ठिकाण आहे. येथे कायम गर्दी असते, मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे या परिसरातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे येथील अर्थकारणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. सर्व अर्थकारण मंदिरावर अवलंबून असल्याचे सांगून हे मंदिर बाराव्या शतकातील प्राचीन मंदिर असून अनेक राज्यांमधून येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते अशी प्रस्तावना या पथकासमोर करून तुळजापूर येथील मंदिराचे महत्त्व सांगितले.
केंद्रीय पथकाकडून उपजिल्हा रुग्णालय आणि 124 भक्तनिवास तसेच होमकोरेनटाईन झालेल्या ठिकाणी परिसराला भेट देण्याचे नियोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र या केंद्रीय पथकाने भेट न देता हा दौरा आटोपता घेतला. केवळ तुळजाभवानी देवीचे दर्शन आणि सत्कार घेऊन हे पथक उस्मानाबादकडे रवाना झाले.