तुळजापुर, दि.२ : डॉ.सतीश महामुनी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली. 

भक्तीभावाने  आई राजा उदो, उदो चा जयघोष करीत तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर प्रतीकात्मक विविध रंगांची उधळण करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिरात सकाळी होणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अभिषेक पूजा व नित्योपचार पूजा संपन्न झाली. विधिवत पद्धतीने देवीचा अंगारा काढण्यात आला. दरम्यान पूजा विधि संपन्न झाल्यानंतर विविध रंगी रंग असलेली तबक गाभाऱ्यात आणण्यात आले आणि देवीच्या अंगावर प्रतीकात्मक गुलाबी निळा हिरवा पिवळा आणि लाल व मोरपंखी अशा रंगांची उधळण करण्यात आली.

आई राजा, उदो, उदो सदानंदीचा उदो, उदो असा जयघोष करीत मोठया  जल्लोषात पुजारी बांधवांनी   एकमेकांना रंग लावून  रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देवीच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये रंगपंचमीच्या उत्साहाचे वातावरण होते. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात अभूतपूर्व आनंदामध्ये साजरा करण्यात आलेल्या रंगपंचमीचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होता. महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी अतुल मलबा, विकास मलबा, विशाल रोचकरी, संजय सोंजी, अविनाश गंगणे, सुहास भैये, रवींद्र साळुंखे, दुर्गेश छत्रे ,सुधीर रोचकरी, बापूसाहेब रोचकरी, प्रशांत क्षीरसागर, किरण लोंढे यांच्यासह पुजारी सेवेकरी  उपस्थित होते
 
Top