नळदुर्ग ,दि. २७ :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२० वे जन्मकल्यानक महोत्सव कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
अणदुर ता.तुळजापूर रविवारी दि.२५ सकाळी भगवंताच्या मूर्तीस प्रक्षाळ अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता भगवंताना महाअभिषेक व महाशांतिधरा करण्यात आली. गावातील मिरवणूक रद्द करून या वेळी भगवंताच्या प्रतिमेची मंदिरामध्येच चार श्रावकांनी प्रतीकात्मक मिरवणूक काढली. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे पंचतत्व जगाला देणारे भगवान महावीर यांच्या गुणांना स्मरून ते आत्मसात करणे, ही काळाची गरज बनली आहे. कोरोनासारख्या महामारीमध्येही भगवान महावीरांची शिकवण जगाला या संकटातून बाहेर काढण्यास सक्षम आहे. गरज आहे ती त्यांच्या गुणांना व शिकवणीला समजून घेऊन आत्मसात करण्याची, असा संदेश या वेळी देण्यात आला.
सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते भगवंताच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. या कार्यक्रमास जैन समाज बांधव आपल्या घरातूनच ऑनलाइनद्वारे जयंती कार्यक्रमाचा लाभ घेतला.