कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांच्या मानसिकतेत सकारात्मकता निर्माण होवून त्यांना तणावमुक्त जीवन जगता यावे, यासाठी शहरातील मंत्री परिवाराच्या वतीने म्युझिक सिस्टमची सोय करण्यात आली आहे. ही यंत्रसामग्री जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
जिल्हा शासकीय रूग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेले रूग्ण जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे मानसिक ताणतणावात व घाबरलेल्या अवस्थेत राहात आहेत. मानसिक आरोग्य खालावत चालल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. असे रूग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे तणावमुक्त जीवन जगत उपचार घेवून रूग्ण बरे व्हावेत, त्यांची मानसिकता सकारात्मक असावी यासाठी कोरोना वॉर्डात आल्हाददायक वातावरण निर्मिती करणे गरजेचे होते.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलेल्या सूचनेस प्रतिसाद देत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री व परिवाराच्यावतीने तत्काळ म्युझिक सिस्टमची सोय करण्यात आली. त्यासाठी लागणारे सर्व यंत्रसामग्री व साहित्य जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील आदी उपस्थित होते.