जळकोट,दि.१ :मेघराज किलजे
जळकोट ता.तुळजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याने चालू हंगामात काढून कडब्याची बणीम रचली होती.या कडबा गंजीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सहा हजार कडबा जळून खाक झाला.
त्याचबरोबर २५ पॉकेट ज्वारी व ४५ स्पिंकलर पाईप जळाले. ही घटना गुरुवार दि.१ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, जळकोट येथील सोमनाथ महादेव सोनटक्के यांची गट नंबर१२३ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी जवळ स्वतःची शेती आहे. या शेतीवरून वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्हीची लाईन गेली आहे. सोमनाथ सोनटक्के यांनी यावर्षीच्या चालू हंगामात ज्वारी पिकाची रास करून ६ हजार कडब्याची गंज रचली होती.
या कडब्याच्या गंजीला गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सर्व कडबा जळून खाक झाला. तर पंचवीस पाकीट ज्वारी व ४५ स्पिंकलर पाईपही जळून भस्मसात झाले. सध्या उन्हाचा पारा वाढत चालल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या आगीत शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.
तलाठी टि. डी.कदम यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या पंचनामावर संजय माने , प्रशांत किलजे, नरसिंग सुरवसे, खंडेराव भोगे व नेताजी बनछेडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.