तुळजापुर, दि. १०: डॉ. सतीश महामुनी
ज्या उसउत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस दिलेला आहे , त्या सर्व साखर कारखान्यांनी उसाची बिले तातडीने अदा करावीत, या अडचणीच्या काळात शेतकऱ्याला मदत करण्यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबराव घुगे यांनी केली आहे.
कोरोना संसर्गाची परिस्थिती नाजूक असताना शेतकऱ्याला आज उसाच्या बिलाची नितांत गरज आहे .गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी बिलाची वाट बघत आहेत. राज्य सरकारांनी साखर आयुक्त यांनी साखर कारखान्यांनी बरोबर तातडीने पत्रव्यवहार करून शेतकऱ्याची उसाची बिले तातडीने अदा करावेत अशी मागणी भाजपाचे माजी प.स. सदस्य साहेबराव घुगे यांनी केली आहे.
त्यांनी साखर आयुक्त यांना पाठवलेल्या पत्रामध्ये डिसेंबर महिन्यापासून शेतकऱ्याने साखर कारखान्याला ऊस दिला आहे. आज पर्यंत सर्व शेतकऱ्यांना बिले अदा होणे अपेक्षित असताना अद्याप बिले देण्याची सुरुवात झालेली नाही.
लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आठ-दहा महिने ऊस सांभाळून साखर कारखान्यांना दिला आहे.ऊस सांभाळत असताना त्यासाठी लागणारा खर्च आणि उत्पन्नाच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी आपले आर्थिक गणित मांडलेले असते हे गणित सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी येणाऱ्या पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर सर्व पैसे जमा करावेत अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नसताना वेगवेगळ्या शेतकरी संघटना मात्र यासंदर्भात गप्प आहेत याविषयी साहेबराव घुगे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.