काटी , दि.२५ :
काटी ता. तुळजापूर येथील निवृत्त पोस्टमन, सेवा कालावधीत प्रामाणिकपणे काम करणारे भारत बब्रुवान शिंदे आणि कॉंग्रेसचे मंगरुळ येथे चालक म्हणुन काम करणारे शंकर उर्फ बाबा शंकर ढगे या दोघांचे रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवार दि. 25 रोजी कोरोनामुळे निधन झाले.
शनिवारी सदाशिव गिरी व लक्ष्मण चिवरे यांच्या निधना पाठोपाठ या दोघांचेही निधन झाल्यामुळे ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गावात अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा गावात मुक्त संचार सुरू असल्याने अनेकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या व कोरोनाबाधिंताचा मुक्त संचार याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने मंगळवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत शिंदे आणि शंकर उर्फ बाबा ढगे यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता तुळजापूर येथील अपसिंगा रोडकडील कपिल धारा स्मशानभूमीत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारत शिंदे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी,एक भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर शंकर ढगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर काटी येथे मोफत कोरोना ॲन्टेजिन टेस्ट शिबिर व येथील जिल्हा परिषद प्रशालेत कोविड सेंटर सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.