उस्मानाबाद,दि.24
शा
सध्या स्थितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तपासणीअंती बरेच नागरिक पॉझिटिव येत आहेत. बरेच लोक सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य आजार अंगावर काढत आहेत. काही नागरिक भीतीपोटी दवाखान्यात जात नाहीत. त्यांची आरोग्य परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर उशीराने दवाखान्यात येत आहेत.यामुळे बराचसा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
कोणालाही घरबसल्या त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारीबाबत मोफत सल्ला घेण्याची संधी ई-संजीवनी ऑनलाइन ॲपद्वारे घेता येते.त्यामुळे ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ,त्यांनी प्ले स्टोर मध्ये जाऊन संजीवनी ओपीडी नॅशनल टेली कन्सल्टेशन सर्विस हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे.
त्यांना त्यांच्या आजाराविषयी सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी पावणेतीन ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये मोफत सल्ला घेता येऊ शकतो.तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन स्वतःचे व इतरांचे आरोग्य सांभाळण्यात पुढाकार घ्यावा, असे डॉ. फड यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही गाव भेटीच्या वेळी डॉ.फड यांनी नागरिकांशी या सेवेच्या अनुषंगाने चर्चा व मार्गदर्शन केले. यावेळी फड यांचे समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, गटविकास अधिकारी श्रीमती दीवाने, स. गटविकास अधिकारी सुरेश तायडे, सरपंच, ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते.