तुळजापूर, दि. ४ :डाॕ. सतीश महामुनी
श्री .क्षेत्र तुळजापूर येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारने यापूर्वी 325 कोटी रुपयांचे अनुदान दिले. मात्र हे सर्व अनुदान खर्च झाल्यानंतर देखील तुळजापूरात भाविकांना आणि शहरवासीयांना स्वच्छतागृहांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात असणाऱ्या धर्मशाळालगत असणाऱ्या सुलभ शौचालय दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. मात्र हे स्वच्छतागृह बंद असल्यामुळे या परिसरातील नागरिक ,दर्शनासाठी येणार्या भाविकांची मोठी तारांबळ उडत आहे.
हे स्वच्छतागृह बंद आहे तर मग भाविकांनी कुठे जायचे असा प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा दोघेही एकमेकांकडे बघतात आणि त्यांना त्याचे उत्तर मिळत नाही अशी चित्र आणि विचित्र परिस्थिती तुळजाभवानी मंदिर परिसरात निर्माण झाली आहे.
मंदिर परिसर मेन रोड भवानी रोड या विस्तीर्ण परिसरातील बाजारपेठेमध्ये शेकडो दुकाने आहेत. येथे काम करणारे दुकानदार ,दुकानातील नोकर यांना देखील स्वच्छतागृहाचा वापर करता येत नसल्यामुळे खुप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. व्यापाऱ्यांना पर्याय म्हणून स्वतःची मोटरसायकल घेऊन इतरत्र स्वच्छता गृहाकडे जावे लागत आहे. यासंदर्भात तेथे असणाऱ्या माहितगार यांना विचारणा केली असता स्वच्छतागृहाचे चेंबर खराब झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले.
यानिमित्ताने तुळजापूर येथील भाविकांच्या सोयी आणि सुविधा यांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. साडे तीनशे कोटी रुपये खर्च झाल्यानंतर देखील मंदिर परिसरात स्वच्छतागृहांची अडचण तसेच शहरातील इतर भागात देखील ज्याच्या प्रस्थापितांच्या घरासमोर स्वच्छतागृहे उभारली होती ती त्या लोकांनी उध्वस्त केली आहेत. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतागृहांची मोठी अडचण शहरात निर्माण झाली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने संबंधितावर कारवाई करणे गरजेचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी नगरपरिषद या प्रश्नावर उत्तर देऊ शकत नाही. अशी अनेक वर्षापासूनची परिस्थिती आहे.
मंदिराजवळील सदरच्या स्वच्छतागृहाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची आणि भाविकांची सोय करावी अशी मागणी आहे.