तुळजापुर, दि. ७ :
तुळजापूर तालुका,शहर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने तुळजापूर शहरातील कोविड केअर सेंटरला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन तेथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.
१२४ भक्त निवास येथील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत आढावा घेऊन स्वच्छता व आहाराबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. याप्रसंगी रुग्णांची काळजी घेण्यासंदर्भात आणि त्यांच्या सुविधा संदर्भात आमदार पाटील यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
याठिकाणी पाणी टंचाईबाबत तक्रारी आल्यानंतर येथील विंधन विहिरीत पंप टाकून त्वरित पाण्याची व्यवस्था करणे व सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करून देणेबाबत नगरपालिका प्रशासनास सूचना दिल्या आहेत.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, बापू कणे, बाजार समिती सभापती विजय गंगणे, विशाल रोचकरी, किशोर साठे, विजय कंदले, आनंद कंदले, प्रा.संभाजी भोसले, ऋतुराज भोसले यांच्यासह कोविड केअर सेंटर येथील आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.