नळदुर्ग, दि.२८ :
नळदुर्ग येथे सुरू करण्यात येणा-या कोविड केअर सेंटरचे काम प्रगती पथावर असून बुधवार दि. 28 एप्रिल रोजी प्रशासकीय अधिका-यांनी नळदुर्गला भेट देवून पाहणी केली.
कोविड केअर सेंटर सुरु होणार असल्याने नळदुर्ग शहरासह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती सुञानी दिली..
नळदुर्ग तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये ८० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार पर्यंत ५० बेड उपलब्ध करण्याची जबाबदारी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना देण्यात आली होती. उर्वरित ३० बेडची सोय आवश्यकतेनूसार करण्यात येणार आहे. तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीमधून नळदुर्ग नगरपालिकेला यापूर्वी देण्यात आलेली रूग्णवाहिका याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
या अनुषंगाने बुधवार रोजी पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, पंचायत समिती सभापती भिवाजी इंगोले, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले आदींनी भेट देऊन आढावा घेतला व कामास गती देण्याची सूचना केली.