उस्मानाबाद,दि.०१ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून त्याप्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन बेड तसेच रेमडेसीवीर व टॉसिल इंजेक्शन्स कमी आहेत.
जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उस्मानाबाद शहरात 1000 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करावे आणि जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसीवीर, टॉसील इंजेक्शन्स पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध तालुक्यात उद्भवत असलेल्या अडचणी मांडल्या. शिष्टमंडळाने जिल्ह्यात कोविड उपचार सुरू असलेल्या इमारतीत लसीकरण सुरू आहे, हे निदर्शनास आणून देत लसीकरण केंद्रे हे उपचार सुरू असलेल्या ठिकाणी न ठेवता इतरत्र जागी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी विनंती केली, यास जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मान्यता देत येत्या काही दिवसात शहरी भागात लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी आरोग्य विभागाला आदेश दिले.
लोहारा व तुळजापूर येथे कोविड रुग्णांसाठी वाढीव ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली असून डॉक्टरांची उपलब्धता झाल्यास तेथील प्रश्न मार्गी लागेल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी कुन्हाळी (ता.उमरगा) येथील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी 25 किलोमीटर दूरच्या गावी जावे लागत असून तिथेही लसीची उपलब्धता नसल्यास रिकाम्या हाती परत यावे लागत आहे, त्यामुळे सदर गावातील नागरिकांसाठी लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी केली, यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कुन्हाळी गावासाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करण्यास सांगितले.
जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष दिलीप भालेराव, उपाध्यक्ष दीपक जवळगे, सरचिटणीस हरिभाऊ शेळके, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सलमान शेख, समाधान घाटशिळे उपस्थित होते.