तुळजापूर, दि. ११ :डॉ. सतीश महामुनी
महाराष्ट्रातील पत्रकारांना कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑनलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्यात यावा आणि त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे काम करीत आहेत. या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, त्यांच्या सर्व कुटुंबीयांची आणि त्यांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे, त्याचबरोबर पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून मान्यता द्यावी व त्यांना दहा हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले यांनी ही मागणी करीत असताना पत्रकार सातत्याने घराबाहेर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व कुटुंबीयांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे अशी भावना व्यक्त केली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सतत जबाबदारीने काम करीत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. तसेच या आपत्तीच्या काळात त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तुळजापूर पत्रकार सचिन ताकमोगे यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार छायाचित्रकार यांचे तात्काळ शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी ई-मेल द्वारे केली आहे.