तुळजापूर दि १५ : डॉ .सतीश महामुनी
मागील अडीच तीन महिन्यापासून तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व पातळीवर काम केले जात आहे. रुग्ण दागावल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपरिषदेने परिपूर्ण यंत्रणा सज्ज केलेली आहे, जवळपास २०० पेक्षा जास्त अंत्यसंस्कार मागील अडीच महिन्यांमध्ये करण्यात आले आहेत.
तुळजापूर शहरांमध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात राहण्यासाठी मागील वर्षभरापासून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद कार्यालय कार्यरत आहे. या नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी आणि मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी आपल्या सर्व कर्मचारी वर्गाला या काळात सर्व पातळीवर तैनात करून नागरिकांची सेवा चालू ठेवले आहे.
एका बाजूला संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे, फवारणी करणे, गर्दी होऊ न देणे, जनता कर्फ्यू काळात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे यंत्रणा राबवणे' अशी कामे चालू आहेत. तर दुसर्या बाजूला जे कोरोना रुग्ण दगावले , त्यांचा अंत्यसंस्कार करणेही महत्त्वाची जबाबदारी नगरपरिषद पार पडत आहे.
मार्चमध्ये २५ ते ३० रुग्ण दगावले होते, एप्रिल महिन्यात ७५ ते ८५ रुग्ण दगावले, मे महिन्यात आजपर्यत सर्वसाधारणपणे दररोज ५ रुग्ण दगावत आहेत. दररोजची संख्या कमी जास्त होऊ शकते. या सर्वाचे अंत्यसंस्कार परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून नगरपरिषदचे आठ कर्मचारी अंत्यसंस्काराच्या कामासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. त्यांना देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत अंत्यसंस्काराचे कार्य होत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने या सर्व कामाचा खर्च केला जात आहे. एका अंत्यसंस्कारासाठी ३ हजार ९०० रुपये खर्च येत असून नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विनोद गंगणे, नगरसेवक पंडित जगदाळे आणि समाजसेवक आनंद कंदले यांनी या कामासाठी लागणारे सरपन पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या आपत्तीच्या काळात नगरपरिषद तुळजापूर आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि पदाधिकारी व नगरसेवक यांच्या सहकार्याने शासनाच्या निर्देशाप्रमाणे नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.