नळदुर्ग, दि. 12  : अरुण नाईक 
तुळजापूर तालुक्यातील हगलूर गावात बुधवार दि. 12 मे रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने  ऑनलाइन ग्रामसभा पार पडली. महिन्या भरापूर्वीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या वतीने लॉकडॉऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. या कोरोना कालावधीत गावच्या विकासासाठी सरपंच ॲड. जयपाल पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्रयात पहिली ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचा बहुमान पटकाविला आहे. 


हगलूर ता. तुळजापूर येथे ऑनलाईन  ग्रामसभेत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली.  तसेच पोखरा योजनेबाबत कृषी अधिकारी कांचन, कृषिसेवक बरडे, क्लस्टर सेवक दिपक लांडगे  यांनी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन  करून  गावातील सर्व शेतक-यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 


 पोखरा योजना किती महत्त्वाची आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा ही सर्व माहिती देऊन सर्वांना योजनेचा लाभ मिळवून देणारा असल्याचे सांगितले. 


सदर ग्रामसभेमध्ये पोखरा योजनेबाबत शंकाचे निरसन करण्यात आले आहे. ऑनलाइन ग्रामसभेत सरपंच ॲड. जयपाल पाटील, उपसरपंच  महेश गवळी, प्रोपेसर नंदकुमार कांबळे , अण्णासाहेब दराडे, सतीश दराडे,  रामेश्वर घुगे, संगणक ऑपरेटर   खामदेव घुगे उपस्थित होते. संप असल्यामुळे ग्रामसेवक  सहभागी होऊ शकल्या नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली ऑनलाइन ग्रामसभा क्लस्टर सेवक  दीपक लांडगे आणि सरपंच ॲङ जयपाल पाटील यांच्या सहकार्यामुळे पार पडली.
 
Top