तुळजापूर, दि. २५ :
ज्येष्ठ संगीत तज्ञ निवृत्त मुख्याध्यापक अंबऋषी शिंदे गुरुजी यांना तुळजापूरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ते संस्कार भारती तुळजापूरचे माजी अध्यक्ष होते.
तुळजापूर संस्कार भारतीचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्य सांस्कृतिक पुरस्कार निवड समिती मुंबई सदस्य सतिष महामुनी, शनिवार संगीत मंडळ अध्यक्ष लालासाहेब मगर, संस्कार भारती महामंत्री सुधीर महामुनी, ज्येष्ठ चित्रकार नंदकुमार पोतदार, लक्ष्मीकांत सुलाखे, प्रमोद कदम, अविनाश धट यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
तुळजापूर शहरातील कलाक्षेत्रातील विविध संस्थेच्या वतीने याप्रसंगी अंबऋषी शिंदे गुरुजी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संगीततज्ञ अंबऋषी शिंदे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्याच्या सांस्कृतिक आणि संगीतमय वाटचालीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. संस्कार भारती आणि शनिवार संगीत मंडळ या दोन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संगीताचा प्रसार आणि प्रचार तसेच नवीन कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे सतत काम केले. शंकरराव कदम गुरुजी व अंबऋषी शिंदे गुरुजी या जोडीने लातूर आणि उस्मानाबाद एकत्र असणाऱ्या जिल्ह्यापासून आज पर्यंत प्रदीर्घकाळ संगीत क्षेत्राची सेवा केली. याशिवाय त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये अत्यंत प्रभावशाली आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिक्षण दिले.
अंबऋषी शिंदे गुरुजी यांचे निधन झाल्यामुळे जुन्या पुण्यातील एका संगीततज्ञला उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण विभाग आणि कला क्षेत्रातील विविध संस्था मुकलेल्या आहेत ,अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.