काटी,दि.२२: उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील धोत्री  येथील साठवण तलावातून विद्युत पंपासाठी अंथरलेल्या कट झालेल्या केबलला बैलाच्या पायांचा स्पर्श झाल्याने
दोन्ही बैलांना विजेचा शॉक लागुन जागीच ठार झाले. तर बैलगाडीतील शेतकरी बंधू सोमनाथ नामदेव हुक्के वय (26) व ज्ञानेश्वर नामदेव हुक्के वय (23)  यांनी बैलगाडीतून तात्काळ कोरड्या जागेत उडी मारल्याने सुदैवाने बालंबाल बचावले.


  याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील शेतकरी समाधान नामदेव हुक्के व ज्ञानेश्वर नामदेव हुक्के हे दोन्ही भाऊ शेतातील मशागतीच्या कामासाठी  शुक्रवार दि. (21) रोजी सकाळी 8:30  वाजण्याच्या दरम्यान मशागतीच्या अवजारासह बैलगाडीतून शेताकडे जात होते. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे साठवण तलावाचे पाणी वाढल्याने व तलावातील माती उपसा केल्यामुळे आणि शेतकऱ्यांनी विद्युत पंपासाठी अंथरलेल्या कट झालेल्या पाण्यातील केबल वायरचा अंदाज न आला नाही. दोन्ही बैलांचा कट झालेल्या वायरला स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा शॉक लागून बैलगाडीचे दोन्ही बैल जागीच ठार झाले. बैलांना शॉक लागल्याचे लक्षात येताच शेतकरी समाधान हुक्के व ज्ञानेश्वर हुक्के   यांनी तात्काळ कोरड्या जागेत उड्या मारत पाण्याबाहेर येत आपला जीव वाचवून विद्युत प्रवाह बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दोन्ही बैल मृत्यूमुखी पडले होते.  समाधान हुक्के यांच्या हाताला थोडी इजा झाल्यामुळे त्यांना काटगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचार केले.

         
ऐन खरीप पूर्व मशागतीच्या व पेरणीच्या वेळी अशी दुर्दैवी घटना घडल्याने  शेतकऱ्यावर कोरोना काळात मोठे आर्थिक संकट कोसळल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत असून या शेतकऱ्यास प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 
Top