लोहारा,दि.०१ : इकबाल मुल्ला
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रत्येक व्यक्तीने कंबर कसली पाहिजे, तन, मन, धनाने आपले गाव कोरोना मुक्त करण्यासाठी खंबीर पणे लढले पाहिजे. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला मुरड घातल्यास कोरोनावर नकीच मात करता येईल असे प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले.
सास्तूर ता. लोहारा येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय व निवासी अपंग शाळा सास्तूरच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहकार्याने जि. प. सदस्या शीतल राहुल पाटील व राहुल पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना संबंधित नियामंचे काटेकोरपणे पालन करीत सास्तूर गावातून कोरोना विषयी जनजागृती फेरी काढण्यात आली.
अफवांना बळी न पडता सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वांनी आधी कोरोना लस घेण्याचे आवाहन जि.प.सदस्या शीतलताई पाटील यांनी केले. तसेच लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या नागरिकांना जरी कोरोना संसर्ग झाला तरी त्यांचे प्राण शंभर टक्के वाचणार आहेत व रुग्ण गंभीर होणार नाही, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केला.
ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे , त्यांनी लस घेतल्यानंतर देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, सतत हात धूत राहावे, दोन व्यक्ती मध्ये किमान ६ फुट अंतर ठेवावे, रस्त्यावर थुंकू नये ,शक्यतो कौटुंबिक कार्यकर्म टाळावे, एवढे करत असताना लसीचे २ डोस घेऊनही कोरोनाची लागन झालीच तर त्यांची तीव्रता खूप नसते. ते लगेच बरा होतो .
त्यामुळे ४५ वर्षा वरील व्यक्तींनी आवर्जून लस घ्यावी असे आवाहन राहुल पाटील यांनी केले. बरेच नागरीक अजूनही आजार अंगावर काढतात. दवाखान्यात जायला व कोरोनाची तपासणी करायला घाबरतात. त्यांनी न घाबरता दवाखान्यात जावुन तपासणी करून घ्यावी,
एखादी व्यक्ती कोरोना बांधित आली तर कोविड केअर सेंटरला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जर घरी काळजी घेण्यासाठी रुग्णांची इच्छा असेल तर त्यासाठीच्या नियमांचे पालन करून ग्रह विलगीकरणात राहावे.
रमाकांत जोशी म्हणाले कि, रुग्णांनी घरी कोरोना उपचार करून घेण्यासाठी काही शासकीय नियम आहेत. त्यात घरी राहणाऱ्या कोरोना बांधिताला हवा खेळती असलेल्या स्वतंत्र खोलीत राहावे लागेल, रुग्णाने नेहमी ट्रिपल लेअर मास्क वापरावा, दर आठ तासांनी हा मास्क बदलावा, रुग्णांनी जेवणात सकस आहाराचा समावेश करावा, पुरेशी झोप घ्यावी, दर चार तासांनी तपासणी, दिवसातून ३ वेळा स्पाँज तपासणी कारवी, रुग्णाने वापरलेल्या वस्तू नियमितपणे निर्जंतुक कराव्यात, रुग्णाने दिवसातून २ वेळा कोमट पाण्याच्या गुळण्या व वाफ घ्यावी, श्वसनास त्रास, स्पाँज ९४ च्या खाली असल्यास त्वरित दवाखान्यात जावे, होम आयसोलेशन संपल्यावर परत चाचणीची गरज नाही. इत्यादी माहिती रमाकांत जोशी यांनी ग्रामस्थाना दिली.
उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी सास्तूर गावात चालू असणाऱ्या माझे गाव माझे कुठुंब अभियाना अंतर्गत सर्वेक्षणाचा आढावा घेऊन सर्व पर्यवेक्षकानी वेळोवेळी रुग्णाची तपासणी करावी व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ताबडतोब दवाखान्यात तपासणीसाठी पाठवावे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांशी सवांद साधून लॉकडॉउनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचावर कारवाई करण्याचे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे यांनी नागरिकांना असे आवाहन केले कि, गावकऱ्यांनी आपल्या गावात कोरोना रुग्ण वाढणार नाहीत. याची काळजी घेऊन ग्राम कोरोना मुक्त समित्या बळकट कराव्यात तसेच लस घेतल्या नंतर तीन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण होऊ शकतो हा संभाव्य धोका ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कठारे, सौ.शीतल पाटील, राहुल पाटील, सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक डी.आय.गोरे, सर्व ग्रा.पं. सदस्य, बालाजी नादरगे, एम. जी.वाघमोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मस्के, गावातील सर्व संघटनाचे प्रमुख, तंटामुक्ती समिती सदस्य, अध्यक्ष ' प्रतिष्ठित नागरिक ,स्पर्श रुग्णालयाचे डॉक्टर्स , कर्मचारी उपस्थित होते.