उस्मानाबाद, दि. १०:
उस्मानाबाद येथे जिल्ह्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात सोमवार रोजी राज्याचे स्वच्छता-पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
कोविड - 19 प्रादुर्भावाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. या काळात रुग्ण संख्या कमी करण्यासाठी टेस्टिंग आणि ट्रेसिंग वाढवावी, मृत्यूदर कमी करण्यासाठी वेळेत उपचार करावेत, भविष्यात येणारी तिसरी लाट लक्षात घेता लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवावी. तसेच सध्याच्या काळात लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रसार जाणवत असल्याने त्यांच्यासाठीही कोविड केअर सेंटर चालू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलावीत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स वापरात आणावेत, ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्सच्या वापराचे मूल्यमापन महसूल यंत्रणे मार्फत स्वतंत्र करण्यात यावे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयास टोल फ्री नं निर्माण करण्यात यावा.
NRBM (Non Re-Breathable) OXYGEN MASK वापरावेत त्यामुळे ऑक्सिजन कमी वापरात येतो. 10 पेक्षा जास्त मृत्यू पावलेल्या गावातील नागरिकांची टेस्टिंग परत कराव्यात. अशा सूचना करण्यात आल्या.
लसीचा दुसरा डोस वेळेत मिळत नसल्याने जनतेला त्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने लसीचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 18 ते 45 वयोगटातील लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र निहाय आठवड्याचे दिवस निश्चित करून सुनियोजित लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऑक्सिजन व रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी वॉर रूमच्या अधिकाऱ्यांनी सदैव कार्यशील राहावे, रेमडेसीविर इंजेक्शन पात्र व गरजू रुग्णांना देण्यात येत असल्याची खातरजमा करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाची कोणतेही लक्षण दिसत असेल तर तात्काळ आम्हाला संपर्क करावे, लक्षणे लपवू नये. तसेच कोरोनावर उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातच घेण्यात यावे, खासगी डॉक्टर्स कडील उपचार टाळण्याचे अवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस कळंब - उस्मानाबाद चे आमदार कैलास घाडगे पाटील, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी आ.राहुल मोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जीवनराव गोरे, प्रतापसिंह पाटील, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन, जिल्हा शल्यचिकित्सक डी.के.पाटील, डॉ.मुल्ला, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जि.प.सदस्या सक्षणा सलगर, नगरसेवक अमित शिंदे आदी संबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.